चौफेर न्यूज – बहुप्रतिक्षित पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला अखेर हिरवा कंदिल मिळाला असून पुढील महिन्यात म्हणजेच 2 डिसेंबर 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यात आल्यावर पुणेकरांच्या मागणीनुसार 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता पुणे- सिंगापूर ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होत आहे.
त्याचबरोबर आता पुण्यातून थेट जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी ही घोषणा केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे आता पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-बँकॉक विमानसेवेचे शनिवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या तीन देशात विमानसेवा सुरु करणार अशी घोषणा केली आहे. या विमानसेवेचा अनेक पुणेकरांना फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी यावेळी ऑनलाइन भाषण केलं. त्यावेळी पुण्याला जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेसाठी कॉल ऑफ कॉल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
त्यामुळे भविष्यात पुण्यातील सध्याच्या धावपट्टीचा विस्तार केल्यास अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीशी थेट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल, असं ते म्हणाले. पुणे माझे शहर आहे. हे देशाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र देखील आहे. या शहराच्या कानाकोपऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्पर्श आहे. याशिवाय, हे राष्ट्रवाद आणि साम्यवादाचे केंद्र आहे.
मला अभिमान आहे की मला या शहराची आणि पुण्याच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, असंही ते म्हणाले. त्याच बरोबर आता पुणे विमानतळावरील प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेऊन, आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुण्यातील आठ स्लॉट वाढवण्याची विनंती केली. पण त्याने आम्हाला तब्बल 14 स्लॉट वाढवले. त्यामुळे आता विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सिंधिया म्हणाले.
दरम्यान, पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. म्हणजेच आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे.