चौफेर न्यूज – आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते. पण, यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर, आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. पण, असे अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही. ध्येय तर हे लोक ठरवतात. पण, ते पूर्ण मात्र करू शकत नाहीत. यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल, तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा.
जो माणूस योग्य कारणासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. परंतू जो माणूस कामचुकारपणा, आळस, कंटाळा, पाट्या टाकण्याचे काम करतो, तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. एका रात्रीत कोणताही व्यक्ती यशस्वी होत नाही. कष्ट आणि निष्टेचे खत त्यासाठी घालावे लागते. हे सर्व करत असताना माणसाचा आत्मविश्वास कामी येतो. आत्मविश्वास ज्याच्या मनात ठासून भरला आहे. कोणतेही काम त्याला अशक्य नसते. आपल्या ध्येयाकडे न थांबता न थकता जो व्यक्ती चालत राहतो त्याला आपले ध्येय कधीच दूर नसते. काहीही झाले तर हे लोक आपले ध्येय मिळवतातच. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कारणे सांगत बसू नका. विचार तुम्हाला ध्येयाप्रती पोहोचण्यास मदत करते. अल्पसंतृष्ट राहू नका- अनेक लोकांना अल्पसंतृष्ट राहण्याची भारी हौस असते. जे लोक मिळाले आहे त्यात धन्यता मानतात. पण, एवढ्याने तुमची स्वप्ने साकार होत नाहीत. त्यासाठी सतत आपली महत्वाकांक्षा वाढती ठेवायला हवी.
जीवनात यशस्वी होण्यासाठी…..
यशस्वी होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे की तुम्ही तुमच्या जीवनाचा जो मार्ग बनवला आहे, त्याच मार्गावरून चालत आहात. अनेक गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही घाबरता, परंतु मनातील या भीतीवर मात करण्याचे तुम्ही शिकला आहात. हळूहळू अनुभवाने तुम्ही तुमच्या मनातील विविध प्रकारच्या भीतींवर मात केलेली आहे. मोठे यश मिळविताना आपण अनेक वेळा अयशस्वी होतो, परंतु या अपयशामुळे खचून न जाता तुम्ही त्यातून मार्ग काढता आणि पुढे जाता. तुम्ही सर्वांशी खुलेपणाने भेटता आणि कोणाबद्दलही पूर्वग्रहदूषित विचार करत नाही. तुमच्यामुळे अनेक लोकांच्या चेह-यावर हास्य येते. प्रत्येक माणसाकडून तुम्ही काही ना काही शिकलेले आहात. तसेच दुस-याला समाधानी बनवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर तुम्ही दुस-यांचा मानही राखता.