गोल्ड कोस्ट : दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील सी वर्ल्डजवळ घडली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की एक हेलिकॉप्टर टेक ऑफ करत होते तर दुसरे लँडिंग करत असताना हा अपघात झाला, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी दिली आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला. अन्य तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे ते एकाच हेलिकॉप्टरमधील आहेत. चार मृतांमध्ये दोघे ब्रिटनमधील नागरिक आहेत, असे वृत्त बीबीसीने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.
इमर्जन्सी लँडिंग करणाऱ्या दुसऱ्या एका हेलिकॉप्टरमधील सहा जणांपैकी पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ” ज्यांना या अपघातात हानी झाली आहे त्यांच्याप्रति माझी सहानुभूती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो या अपघाताच्या घटनेचा तपास करत आहे. ब्रिस्बेनच्या दक्षिणेस सुमारे ७५ किमी (४७ मैल) अंतरावर मेन बीच म्हणून ओळखल्या जाणार्या पर्यटन स्थळाजवळच हा अपघात घडला.