पुणे : राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे दोन आमदार यांचे मागील महिन्यात निधन झाले होते. यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
दरम्यान, चिंचवड विधानभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.