महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा अर्ज दाखल
पिंपरी :- चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासाठी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार हे मैदानात उतरले आहे. आज अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि.७) रोजी उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज थेरगाव निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २६ फेब्रुवारीला पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. सोमवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी देखील डमी अर्ज सादर केला आहे. तर सोमवारपर्यंत १४ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राहुल कलाटे हे देखील आज अपक्ष अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.