पिंपरी : जॉय इलेव्हन (अ) ने विशाल नगर क्रिकेट क्लबला अंतिम सामन्यात 14.1 षटकातच सर्वबाद 65 धावांमध्ये रोखून पंचवीस लाख रुपयांच्या बक्षिसासह लक्ष्मीबाई नांदगुडे चषक जिंकला. पिंपळे निलख विशालनगर येथील युवकांच्या क्रिडागुणांना संधी मिळावी म्हणून नांदगुडे पाटील फाऊंडेशनच्या ज्येष्ठ नगरसेवक विलास नांदगुडे यांच्या वतीने भव्य टेनिस बॉलच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (दि. 12 डिसेंबर) जॉय इलेव्हन (अ) विरुध विशाल नगर क्रिकेट क्लब (व्हीएनसीसी) यांच्यात झाला. व्हीएनसीसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सनी अगरवालने 20 चेंडूत 25 धावा तर अमर भोसलेने नऊ चेंडूत सोळा धावा केल्या. धाव फलकावर नऊ षटकात चार बाद 52 धावा झाल्यानंतर व्हीएनसीसीचा संघ 14.1 षटकात सर्वबाद अवघ्या 65 धावात तंबूत परतला. जॉय इलेव्हन (अ) चा भेदक गोलंदाज तीन षटकात एक निर्धाव षटक टाकून नऊ धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाज तंबूत पाठविले. तर लक्ष्मण आतकरे याने दोन षटकात सतरा धावांमध्ये दोन विकेट घेतल्या. जॉय इलेव्हन (अ) चा कप्तान अक्षय खाटमोडे याने सतरा धावा, ऋषी शेंडगे नाबाद चौदा धावा, आनंद तोमर बारा धावा करुन चार विकेट गमावून 8.4 षटकात एकुण 68 धावा करुन अंतिम सामना जिंकला आणि पंचवीस लाख रुपयांच्या बक्षिसासह लक्ष्मीबाई नांदगुडे चषक जिंकला. उपविजेता संघ व्हीएनसीसी पंधरा लाख रुपये आणि कै. रामचंद्रबूवा बालवडकर यांच्या स्मरणार्थ अशोकराव बालवडकर यांच्या वतीने चषक, तृतीय क्रमांक विजेता एट थंडर क्रिकेट क्लब दहा लाख रुपये आणि कै. सुरेशराव टकले यांच्या स्मरणार्थ प्रकाश टकले यांच्या वतीने चषक, चतुर्थ क्रमांक विजेता एन्जॉय इलेव्हन पाच लाख रुपये आणि कै. वसंतराव जगताप यांच्या स्मरणार्थ प्रशांत जगताप यांच्या वतीने चषक, जय गणेश इलेव्हन हा शिस्तबध्द संघ ठरला असून त्यांना तीन लाख रुपये आणि कै. सुधीर सुर्वे स्मरणार्थ विक्रांत सुर्वे यांच्या वतीने चषक जाहीर करण्यात आला. वैयक्तिक बक्षीसांमध्ये जॉय इलेव्हन (अ) चा अक्षय खाटमोडे याने मॅन ऑफ द सिरिज पुरस्कार आणि मारुती अल्टो कार जिंकली. सर्वाधिक षटकार करणारा अक्षय खाटमोडे, उत्कृष्ट फलंदाज ठरलेला सनी अगरवाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रदिप वाघमारे, उत्कृष्ट गोलंदाज गणेश बडगे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस मिळविले. तसेच प्रदिप वाघमारे, आनंद अगरवाल, संतोष पवार, सनी अगरवाल, आदर्श खाटमोडे, वैभव रुपनर, सुजित कलाटे, रियाज, सनी अगरवाल आणि गणेश बडगे यांनी मॅन ऑफ द डे पुरस्कार मिळवून रोख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. आयोजक व ज्येष्ठ नगरसेवक विलास नांदगुडे, माजी नगरसेविका सुजाता नांदगुडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. आयोजनात मोती मुदलियार, राजू गोसावी यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दि. 25 डिसेंबर रोजी 4.30 वाजता पिंपळे निलख येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक व ज्येष्ठ नगरसेवक विलास नांदगुडे यांनी दिली आहे.