पिंपरी : राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षणमंडळातर्फे युद्धपातळीवरती चालू असून, सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी म्हणाले की, शहरातील बालवाडी, महापालिकेच्या शाळा, खाजगी शाळा असे एकूण 3 लाख 39 हजार 841 विद्यार्थ्यांची महापालिकेकडे नोंद आहे. त्यामधील 2 लाख 47 हजार 610 विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी झालेली आहे. केवळ 91 हजार 952 विद्यार्थ्यांच्या नोंदणी राहिली आहे. थेरगाव व इंद्रायणीनगर येथे विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी केली जाणार आहे. मात्र, नोंदणीच्या मशीन बंद पडणे किंवा बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे न उमटणे, मनुष्यबळ कमी असे काही अडथळे असल्याचेही, आवारी यांनी कबूल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी 25 डिसेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीची मुदत दिली आहे.




















