मुंबई – मुंबई मेट्रो मार्ग-३ च्या १५ दिवसांच्या छायाचित्र प्रदर्शनासह नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) ने नूतनीकरण केलेल्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यानची चित्त थरारक दृष्य छायाचित्राच्या माध्यमातून पाहण्याची तसेच अभियांत्रिकी अविष्कार व प्रकल्पाची जटिलता समजून घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.

एनसीपीएच्या नूतनीकरण केलेल्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत मुंबई मेट्रो मार्ग-३, मुंबई सागरी मार्ग आणि मुंबई पार बंदर प्रकल्पासारख्या शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या निर्मितीची अनुभूती या छायाचित्र प्रदर्शनातून अनुभवता येणार आहे. यासाठी छायाचित्र प्रदर्शनाच्या ३ भागांची मालिका आयोजित करण्यात आली असून मेट्रो मार्ग-३ च्या छायाचित्र प्रदर्शनापासून या उपक्रमाला सुरूवात होत आहे. मेट्रो-३ वरील हे प्रदर्शन मुंबईकरांना ३ मार्च ते १६ मार्च २०२३ दरम्यान दुपारी १२ ते ८ या वेळेत पाहता येणार आहे.

मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचे एकूण ७९.८% बांधकाम पूर्ण झाले असून यातील पहिला टप्पा आरे ते बीकेसीचे ८५.२% तर दुसरा टप्पा बीकेसी ते कफ परेडचे ७६% बांधकाम पूर्ण झाले आहे.





















