नाशिक न्यायालयाचा दणका; निकालानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik Session Court) 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आमदार कडू यांनी 2017 मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणात त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक करणे, यासाठी कलम 353 अन्वये शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
बच्चू कडू यांनी 2017 मध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी महापालिकेत आंदोलन केलं होतं. त्यादरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. इतकेच नाही तर त्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणातून बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. याशिवाय त्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.