पिंपरी :– “एकच मिशन जुनी पेन्शन”.. “पेन्शन आमच्या हक्काची”.. “जुनी पेन्शन योजना लागू करा”.. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका युनियनचे प्रतिनिधी योगेश रसाळ व प्रशांत भिसे यांनी पिंपरी ते विधानभवन (मुंबई) पायी प्रवास केला आहे. शुक्रवार दि.१० मार्च रोजी पिंपरीतून पायी प्रवासाला सुरूवात झाली असून आज सोमवार दि.१३ मार्च रोजी दुपारी ते मुंबई येथील विधानभवनात पोहचणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्यभर सध्या गाजत असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्वात ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे. याच मुद्द्यावरून सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला संपाचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील नोव्हेंबर २००५ पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे युनियन प्रतिनिधी योगेश रसाळ व प्रशांत भिसे यांनी ३५०० कर्मचाऱ्यांचे सह्यांचे निवेदन घेऊन १० मार्च रोजी पिंपरी ते विधान भवन असा पायी प्रवास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सर्व कर्मचाऱ्यांचे निवेदन देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यात सर्व कर्मचारी वेगवेगळ्या टप्प्यावर या आंदोलनात सामील होत आहेत. आज दि.१३ मार्च रोजी सर्व कर्मचारी विधानभवनाच्या दालनात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात सामील होणार आहे. या दोन कर्मचाऱ्यांनी कामगारांच्या भवितव्यासाठी उचललेल्या या पावलासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






















