पिंपरी :- आर्थिक वर्ष संपत आले असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची करसंकलन मोहिम सुद्धा कडक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने यावर्षी 1000 कोटी करसंकलनाचे उद्दीष्ट्य ठेवले असल्याने आता थकबाकीदारांना विविध माध्यमातून कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी आता प्रत्येक झोन मधील मोठे थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणार आहे.
वर्तमानपत्रामध्ये निवासी मालमत्ताधारक, दुकानदार, उद्योजक, मोकळ्या जमिनींचे मालमत्ता धारक, विविध संस्था, बॅंक आदी मालमत्ताधारकांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. थकबाकीदारांची यादी दै. लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, प्रभात, महाराष्ट्र टाईम्स, सामना, पुण्यनगरी यासारख्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणार आहेत.
करसंकलन विभागाने 1000 कोटी करसंकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत 681 कोटीची वसूली झाली आहे. आर्थिक वर्ष संपत आले असताना नागरिकांनी थकित मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी विभागाने अधिकचे कॅश काऊंटर वाढविण्यात आले असून त्याची वेळ सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांना कर भरता येणार आहे.
पहिली यादी झाली प्रसिद्ध…
नुकतीच वाकड, भोसरी आणि मोशी विभागातील थकबाकीदारांची यादी दैनिक लोकमत, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली असून थकबाकीदारांची एकूण अंदाजे 90 कोटी रुपये थकीत रक्कम येणे बाकी आहे. या आठवड्यापासून सर्व विभागांची एक लाखाच्या पुढे मूळ कराचा भरणा बाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.
कर संकलन विभागाकडून जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यासारख्या कठोर कारवाया चालूच आहेत. त्या अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांची नावे प्रसिध्द करणे हा या कारवाईचा एक भाग आहे. आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी आपल्या करांचा तातडीने भरणा करावा. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत.
– शेखर सिंह, आयुक्त : पिंपरी चिंचवड महानगरपालिका