पिंपरी :– इन्फ्लुएंझा H3N2 या विषाणूची रुग्णसंख्या राज्यामध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यापासून शहरामध्ये या विषाणूचे सात रुग्ण आढळले होते. सद्यस्थितीत शहरामध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले आहे.
शहरामध्ये H3N2 या विषाणूचे ७ रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुणाचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाला इतर गंभीर आजार होते. तर इतर सहा रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या तीन दिवसांमध्ये शहरामध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरामध्ये H3N2 या विषाणूचा एकही सक्रिय रुग्ण नाही. या विषाणूची लागण झाल्यानंतर सर्दी व खोकला मोठ्या प्रमाणावर होतो, घसादुखी होते. तीव्र स्वरुपाचा ताप येतो.
रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या नागरिकांना या विषाणूची लागण तत्काळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मधुमेह, हृदयरोग यासारखे दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. तसेच, कोरोनाबाधित सुमारे ३० रुग्ण असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. २ ते ३ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काळजी घ्या, घाबरून जाऊ नये..!
सद्यस्थितीत शहरामध्ये एच ३ एन २ चा एकही रुग्ण नाही. आतापर्यंत आढळलेले सात रुग्ण हे जानेवारी महिन्यापासूनचे होते. ज्या एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्याला इतर दुर्धर आजार होते. तसेच त्यांच्या मृत्यूचे कारण हे या विषाणूचे नव्हते. तर आता एकही रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.