मुंबई: केंद्र सरकारने हुबळी-धारवाड, कर्नाटक येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे या मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये 18000 नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी सरकार 180 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर 9 कंपन्या आणि स्टार्टअप्सनी 340 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
180 कोटी रुपयांच्या EMC ची स्थापना मंजूर
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बेंगळुरूमध्ये 180 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) स्थापन करण्यास मंजुरी दिल्याची घोषणा केली. EMC 2.0 योजनेंतर्गत, धारवाड, कर्नाटक येथील कोतुर-बलूर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थापन करण्यात येणार्या क्लस्टरमध्ये 18,000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमध्ये लवकरच 1,500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. स्टार्टअपसह नऊ कंपन्या आधीच २, 500 लोकांना रोजगार देण्याच्या क्षमतेसह 340 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होत आहे. कर्नाटक हे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून उदयास येत आहे. कोलार (विस्ट्रॉन) आणि देवनहल्ली (फॉक्सकॉन) येथील अॅपल प्लांट्ससह दूरसंचार केंद्रे येथे आधीच स्थापन झाली आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच कर्नाटकातील म्हैसूर येथे चाचणी सुविधा विकसित करण्यासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) मंजूर केले आहे.
आणखी तीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाणार…
या योजनेअंतर्गत 1903 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी 889 कोटी रुपये केंद्राने मंजूर केले आहेत. त्याच वेळी, 1,337 एकर क्षेत्रात इतर तीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर्सची स्थापना केली जाईल. यामध्ये 20,910 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.