मालमत्ता कर सवलतीच्या योजनांचा लाभ घ्या :- आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यासाठी गतवर्षी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच नागरिकांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता कर सवलतीच्या विविध योजनांचा 30 जूनपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात 5 लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. गतवर्षी कर संकलन विभागाने महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच 817 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. यासाठी विविध योजना, जप्ती मोहीम, मोठ्या प्रमाणात जनजागृती, बड्या थकबाकीदारांची वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे यासह आदी उपक्रम हाती घेतले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर वसुली करण्यात विभागाला यश आले आहे.
याच अनुषंगाने 2023-24 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटींचा टप्पा गाठण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.
महापालिकेच्या वतीने करदात्या नागरिकांना कराचा भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने 2023-24 या आर्थिक वर्षात 30 जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
पर्यावरण पूरक सवलतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांनी अर्ज करावेत…..
शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरात-लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.
चालू सरकारी वर्षाचे चालू मागणीतील देय सामान्य कर रक्कमेवर खालीलप्रमाणे सामान्य कर सवलत योजना अंमलात आहेत.
1) आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करात 5 टक्के
2) फक्त महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास 30 टक्के सवलत
3) 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस – 50 टक्के सवलत
4) स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास – 50 टक्के सवलत
5) ऑनलाइन पेमेंट गेट वे, RTGS, NEFT, IMPS व्दारे भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना : 30 जूनपर्यंत 5 टक्के तर जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यंत भरणा करणाऱ्या 4 टक्के सवलत
6) कंपोस्टींग यंत्रणा, एस.टी.पी. प्लांट, तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्ता :
ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वीत असल्यास (ओला कचरा पूर्णत: जिरविणाऱ्या) – 5 टक्के
एमटीपी कार्यान्वीत असलेस – 3 टक्के
ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा + एसटीपी कार्यान्वीत असलेस – 8 टक्के
झिरो वेस्ट संकल्पना राबविणेत येत असलेम (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणाऱ्या) – 8 टक्के
झिरो वेस्ट + एस.टी.पी. कार्यान्वीत असलेस (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणाऱ्या) – 10 टक्के
7) माझी मालमत्ता माझी आकारणी योजना : स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची आकारणी करणाऱ्यांसाठी सामान्य करात 2 टक्के सवलत संपूर्ण वर्षासाठी.
8) इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास व इतर वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास करात 2 टक्के सवलत वर्षासाठी
9) प्रामाणिकपणे तीन वर्षे मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या प्रोत्साहन म्हणून 2 टक्के ज्यादा सवलत
10) संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात) 100 टक्के सवलत
11) चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात 5 टक्के सवलत
वरील 1 ते 4 योजनेपैकी कोणत्याही फक्त एका योजनेचा लाभ मालमत्ताधारकास घेता येईल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ 30 जून अखेर भरणे आवश्यक आहे. 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सलवत मिळते त्याचा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी 30 जूनपूर्वी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करावा.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.