चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, तुषार देवरे, वैभव सोनवणे,कुणाल देवरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रसंगी शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. राष्ट्रगीत व ध्वजगीताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. शाळेच्या शिक्षिका सपना देवरे यांनी १ मे कामगार दिनाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.
दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो. कार्यक्रमाला शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.