चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनता संपर्क विभागातील मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक यांच्याकडे जनता सपंर्क अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांना आठ महिन्यांपूर्वी विशेष अधिकारीपदी बढती मिळाली. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.
जनता संपर्क अधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे या पदावर अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी जनता संपर्क विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार विभागातील मुख्य लिपिक पुराणिक यांच्याकडे जनता संपर्क अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आला आहे.
श्री. पुराणिक यांना शहरातील राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्रातील माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महापालिकेच्या मानाच्या समजल्या जाणा-या जनता संपर्क विभागात कार्यरत आहेत. महापुरुषांच्या जयंत्या, आढावा बैठका, दैनंदिन कार्यक्रम आयोजनाबाबत त्यांना अनुभव असून लाडके व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.