पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.
वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.






















