पिंपरी :- रावेत येथील सेंटोसा वॉटर पार्क येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा व सुरक्षा व्यवस्था नसल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १२) घडली. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात सेंटोसा वॉटर पार्कच्या मालकासह मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
याप्रकरणी मालकासह अजय हरिलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर), मॅनेजर राहुल आबा मोरे (रा. रावेत) व सुपरवायझर सागर भगवान काळे (रा. शेळकेवस्ती) यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी (दि.१४) गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
बुडून मृत्यू झालेली मुलगी शाहिरा याकुबअली मुल्ला (वय ६) ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावांसह पिकनिकला आली होती. हॉटेल सेंटोसा पार्क येथे खेळत असताना ती येथील स्विमिंग पुलाजवळ गेली. मात्र, तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. सुरक्षा रक्षक व लाईफगार्ड नव्हते. त्यामुळे लाईफजॅकेट नसताना ती स्विमिंग पुलकडे गेली. त्या ठिकाणी कोणतेही मार्गदर्शक व सूचना फलक नव्हते. त्यामुळे खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे शाहिराचा बुडून मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले.