पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागा मार्फत मिळकत कर हा मनपाचा एक मुख्यमार्ग असून मिळकत धारकांना ३० जून अखेर मुदत देण्यात आलेली आहे.
सदर मिळकत कर सूट रक्कम भरण्यास किमान १ महिना मुदतवाढ देऊन नागरिकांना मिळकत कर भरण्यास दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागा मार्फत मिळकत कर हा मनपाचा एक मुख्यमार्ग असून मिळकत धारकांना सवलतीचा लाभ दिल्यास मिळकत कर जास्त प्रमाणात वसुल होत असून गतवर्षी दि. ३० जून अखेर कर भरणाऱ्या महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतीवर सामान्य करात ५० टक्के सुट देण्यात आली होती परंतु या वर्षी ३० टक्के सुट देण्यात येत आहे.
गतवर्षी रोख स्वरुपात कर भरणाऱ्यांना १० टक्के व ऑनलाईन भरणाऱ्यांना १५ टक्के सूट होती परंतु यावर्षी ५ टक्के व १० टक्के सूट देण्यात येत आहे.सदरची सुट हि ३० जून २०२३ अखेर असून ती सूट किमान एक महिना म्हणजे ३१ जुलै २०२३ अखेर करण्यात यावी.
सदरच्या उपरोक्त बाबींचा विचार केल्यास मनपा मिळकत करात निश्चितवाढ दिसून येईल तसेच मिळकत हस्तांतरण शुल्क मा.दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत चालू बाजार भावा प्रमाणे ठरविण्यात आलेल्या किमतीच्या ०.५ टक्के खूप जास्त आकारण्यात येत असल्याचे दिसुन येते त्यामध्ये हि कपात करणे अत्यावश्यक आहे. हस्तांतरण शुल्क १ टक्के ते २ टक्के करणे गरजेचे आहे.याबाबत योग्य विचार करून बदल केल्यास मनपाच्या वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे, मिळकत धारकांना एक महिना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वाघेरे आयुक्तांकडे केली आहे.