कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. सत्तेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढीचा सामना रंगला आहे. राष्ट्रवादीला सत्ता टिकवायची आहे, तर भाजपला ती खेचून आणायची आहे; मात्र प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच या दोन्ही पक्षात पोस्टरबाजीचा तुफानी खेळ रंगला आहे. भोसरीत सुरू झालेले तिखट शेरेबाजीचे लोण आता संपूर्ण शहरभरात पसरले आहे. या फलकयुद्धात काहीतरी मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत आणि कुठेतरी ते थांबले पाहिजे, याचे भान दोन्ही पक्षांनी ठेवले पाहिजे. अन्यथा, अति झाले आणि हसू झाले, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील; मात्र कशात काही नसताना आतापासूनच प्रचाराचा धुराळा उडाल्याचे पिंपरी-चिंचवडकरांना दिसू लागले आहे. प्रचारकी थाटात जागोजागी मोठमोठे फ्लेक्स लागले आहेत, त्यावर इच्छुक उमेदवारांचे चेहरे दिमाखाने झळकत आहेत. राजकीय पक्षांनी आपापली ध्येय, धोरण, वचननामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्टरबाजीचा आधार घेतला आहे; मात्र बहुतांश फलक अनधिकृत आहेत, हे लपून राहिलेले नाही.
फलकबाजीच्या चढाओढीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. सर्वसामान्य नागरिकांना नियमांचे डोस पाजणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून या फलकबाजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. वर्षानुवर्षे फलकबाजीचा खेळ या शहराने पाहिला आहे. या कामासाठी सर्वांचा पोशींदा एकच जाहिरात ठेकेदार आहे. म्हटले तर सर्वांचा आहे आणि म्हटले तर कोणाचाच नाही. अलीकडचे काही दिवस पाहता, निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी सुरू केलेला आरोप-प्रत्यारोपांचा बाजार सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचा झाला आहे. याची सुरूवात कोणी केली, कुठून केली, हे नेमके सांगता येणार नसले, तरी सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत रंगलेल्या पोस्टरबाजीचे चर्चे भलतेच दूरपर्यंत पोहोचले आहेत. सोशल मीडियावर देखील पिंपरी-चिंचवड शहरातील पोस्टरबाजी रंगली आहे.
महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची मालिका चव्हाट्यावर आणण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे व त्याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा दांभिकपणा उघड करण्याचा सपाटा लावला आहे. या पोस्टरबाजीची सुरूवात यापूर्वी भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत झाली होती. आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराचे मुख्य साधन म्हणून पोस्टरबाजी व त्यावर केलेल्या गाजरासारख्या शेरेबाजीने कहर केला होता. या प्रचारमोहिमेतून लांडगे यांना भरपूर फायदा झाला. आता लांडगे भाजपमध्ये आले आहेत व त्यांच्या पोस्टरबाजीचे लोणही भाजपमध्ये आले आहे. लांडगे यांचे ‘ब्रेन’ म्हणून त्यांचे बंधू ओळखले जातात. त्यांची कल्पकता संपूर्ण भाजपसाठी वापरात येऊ लागली आहे. त्याचपद्धतीने, आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे ‘राईट हॅन्ड’ सारंग कामतेकर यांच्या अनुभवाची शिदोरी भाजपसाठी उपयोगात आणली जात आहे. त्यामुळेच भाजपच्या पोस्टर आणि सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टमधून राष्ट्रवादीला घायाळ करण्याची रणनीती सुरू आहे. सुरूवातीचे काही दिवस भाजपकडून एकतर्फी हल्ला सुरू होता. मात्र, राष्ट्रवादीने प्रतिउत्तरास सुरूवात केली. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीचा आरोप-प्रत्यारोपाचा सामना भलताच रंगला आहे.
सुरूवातीला गमतीशीर वाटणारा हा प्रकार आता मर्यादा ओलांडू लागला आहे. प्रचाराची पातळी सोडली जात असल्याचे संकेतही मिळू लागले आहेत. त्यामुळे कुठेतरी हे सारे थांबले पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. लोकशाहीत अनेक पध्दतीने आपला प्रचार करता येतो, त्यासाठी कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधण्याची गरज नाही, इतके लक्षात ठेवले, तरी पुरेसे आहे.