शहरातील नागरिकांनी देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, युवकांसाठी ‘बढे चलो’ अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी नागरिकांना दिली आहे. या निमीत्त पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा चिंचवड किवळे मंडलाच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत ‘क्रांतीकारक देखावा – देश भक्तीपर गीत लावुन फेरी काढणे’, तिरंगा बाईक रॅली, ‘विभाजन विभीषीका दिन’ साजरा करण्याचे अभियान कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
यामध्ये, शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता, देशभक्तीपर गीते, क्रांतीकारकांचा जिवंत देखावा फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक ते वाल्हेकरवाडी मार्गी सायली कॅाम्प्लेक्स मार्गी ममता स्वीट – स्पाईन रोड येशे समारोप होणार आहे.
रविवार, दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वा. भव्य बाईक तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. सुरुवात : बापुजी युवा मंदिर थेरगाव- डांगे चौक, दत्त मंदिर रोड वाकड- पिंपळे निलख बसस्टॉप जवळ समारोप करण्यात येणार आहे.
सोमवार, दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘विभाजन विभिषिक स्मृती दिन’ या कार्यक्रमांतर्गत देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले, त्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली वाहून १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिन म्हणून पाळला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त सुरुवात चाफेकर वाडयापासून ते चाफेकर चौक अशी अभिवादन फेरी काढून स्वतंत्र सेनानी यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा जागर केला जाणार आहेत.
“अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला जाणार आहे. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, आतषबाजी, वैचारिक व्याख्याने, स्पर्धा, ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला आहे.”
-शंकर जगताप, शहराध्यक्ष- भाजपा, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)