साक्री : साक्री तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या १४ वर्ष वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने अंतिम सामन्यात डीजी अग्रवाल स्कूलच्या संघावर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाने प्रचिती स्कूलच्या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
तालुकास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट रोजी साक्री तालुका क्रीडा संकुल येथे १४ वर्षे वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये, १४ वर्षे वयोगटात तालुक्यातील डी जी अग्रवाल स्कूल पिंपळनेर, सियान इंटरनॅशनल स्कूल पिंपळ, नेर भानू बेन वाणी निजामपूर, ऑर्किड इंटरनॅशनल साक्री या संघांनी सहभाग नोंदविला होता. बाद पध्दतीने स्पर्धेतील सामने खेळविण्यात आले.
यामध्ये, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री विरुद्ध डीजी अग्रवाल स्कूल पिंपळनेर यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत सहा षटकात 56 धावा काढल्या. नंतर डीजी अग्रवाल स्कूलला फलंदाजी करत सहा षटकात फक्त २७ धावा करता आल्या. अंतिम सामन्यात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने 29 धावांनी विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
प्रचिती संघाचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी अभिनंदन केले तसेच येत्या ४ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले. संघास शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, क्रीडा शिक्षक कुणाल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.