पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी मध्ये होणार आहे. त्यासाठी बुधवारी (दि. 11) आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, इच्छुकांनी लावलेले फलक काढण्यास महापालिकेने गुरुवारपासून सुरवात केली आहे. फलक काढण्यास गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना इच्छूक विरोध करत असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बुधवारीच महापालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी प्रभागात विविध कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली होती, आचारसंहिता लागल्यानंतर फलक स्वत:हून काढणे गरजेचे होते. मात्र, शहराच्या विविध भागात इच्छुकांचे फलक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. महापालिकेने आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी फलक काढण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. शहराच्या पिंपरी, भोसरी, चिंचवड, सांगवी, दिघी, निगडी, पिंपळे-सौदागर, वाकड, कासारवाडी अशा विविध ठिकाणी महापालिकेने फलक काढण्यास सुरवात केली आहे.