प्रचिती इनॅटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली आंतरराष्ट्रीय खेळांची प्रेरणा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते माता सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, खेळाच्या साहित्यांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल देवरे यांनी केले. भारतीय हॉकीचे दिग्गज खेळाडू व हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या विषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ते म्हणाले की, दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. ज्यांच्या प्रतिभेने भारताला आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात इतर देशांवर वर्चस्व राखण्यास मदत केली. त्या महान व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी क्रीडा दिन साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेतील शाळास्तर, तालुकास्तर व राज्य पातळीवर विविध क्रीडा प्रकारात विजय मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व यश संपादन केलेल्या विद्यार्थी खेळाडूंचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना शाळेचे शिक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, खेळाच्या इतिहासातील हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाणारे , मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यात विलक्षण योगदान दिले. २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या मेजर ध्यानचंद ‘ हॉकीचे जादूगार ‘ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश इंडियन आर्मीच्या रेजिमेंटल टीममधून केली. ध्यानचंद हे रात्री हॉकीचा सराव करत असत, त्यामुळे त्यांचे प्रसिद्ध नाव ‘चांद ‘ होते. त्यांनी त्यांचे विलक्षण कौशल्य, सुपर कंट्रोल आणि चातुर्य यामुळे भारताला १९२८, १८३२ व १९३६ मध्ये सलग तीन ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकण्यात मदत झाली.
भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ मध्ये तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण देऊन सन्मानित केले. त्यांचे खेळातील योगदान तरुणांना आणि खेळाडूंना प्रेरणा देते, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय खेळ दिनाच्या औचित्याने शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उप प्राचार्य घनश्याम सोनवणे यांनी औपचारिकपणे बुद्धिबळ खेळाला सुरुवात करून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सजावट शाळेचे कलाशिक्षक भूपेंद्र साळुंखे , दीपमाला अहिररार यांनी केली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.