प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा शाळेचा पहिला दिवस बालचिमुकल्यांनी गजबजला….
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे गुरुवार, दि. ३ एप्रिल २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम सत्राला सुरुवात झाली. सर्वप्रथमतः शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते प्रथम दिनाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प वर्षाव करून उत्साहात स्वागत झाले. या खास दिवसासाठी शाळेनच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली होती. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन, गोड वस्तूंचे वाटप, वही- पेन देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसी मोठ्या आनंदात उत्साहात होते. शाळेचे अध्यक्ष व प्राचार्य, शाळा समन्वयक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना शाळेतील जीवनाविषयी मार्गदर्शन केले. या दिवसाचे औचित्य साधण्यात शाळेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या खेळविषयक कार्यक्रमात उत्साहात सहभाग घेतला आणि त्यांनी शाळेतील पहिल्या दिवासाचा आनंद साजरा केला.
एका महिन्याच्या कालावधीनंतर गुरुवारी शाळेची घंटा वाजली आणि शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आनंद दिसत होता. शाळेच्या पहिल्या दिवशी काही पालक आपल्या मुलांना शाळेत सोडायला आले. तर काही मोटर सायकलने व काहींनी तर चार चाकी आणली होती. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेत येताना नवा गणवेश, नवी पुस्तके, नवे शूज परिधान केले होते. नवा वर्ग कसा असेल नवीन माहिती, नवीन मित्र-मैत्रिणींची ओळख व वर्गशिक्षक कोण असणार याची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. एक महिना शाळेचा परिसर विद्यार्थांविना शांत होता. आता शाळेला सुरुवात झाल्याने शाळेच्या परिसरात पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू यायला लागली. तर रस्त्यावर विद्यार्थी-पालकांची यांची गर्दी दिसू लागली. सक्तीच्या रजेवर गेलेल्या स्कूल बस रस्त्यावर आता पुन्हा धावू लागल्या आहेत.
आजचा हा शाळेचा प्रवेशोत्सव कार्यक्रम खरे तर विद्यार्थ्यांमधील शाळा या विषयीची भीती घालवणारा होता. मुळातच शाळेविषयी आपुलकी, अभ्यासाविषयी आवड, मित्र-मैत्रिणींमध्ये आपुलकीचे नाते निर्माण करणार होता.
या कार्यक्रमांमध्ये फलक लेखन, सुंदर सजावट व रांगोळी काढण्याचे कार्य मनोज भिल, भूपेंद्र साळुंखे, जितेंद्र कासार, दीपमाला अहिरराव, वैष्णवी देवरे मॅडम, सविता लाडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. स्वागत गीत नृत्याचे संयोजन गीतांजली काकुस्ते यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सपना ठाकरे, राहुल पाटील यांनी केले. सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने शाळेचा प्रवेशोत्सव दिन मोठ्या उत्साहात आयोजित करून साजरा करण्यात आला.