पिंपरी, दि. १८ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी व मतदार दिनानिमित्त येत्या २४ व २५ जानेवारी २०१७ रोजी भव्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पथनाटय, व्यंगचित्र, वक्तृत्व स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये शहरातील महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या सहकार्याने प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे दि. २४ व २५ जानेवारी २०१७ रोजी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये पथनाट्य, व्यंगचिञ, कोलाज, वक्तृत्व, स्किट या स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांसाठी “मतदान व मतदार जनजागृती जागृती” ही मुख्य संकल्पना आहे. या स्पर्धा मंगळवार दि. २४ जानेवारी २०१७ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे होणार आहेत. तर बुधवार दि. २५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजनही केले आहे. भक्ती शक्ती चौक ते प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डी पर्यंत जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था व रिक्षा संघटना यांचा मोठया प्रमाणावर सहभाग असणार आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बुधवार दि. २५ जानेवारी २०१७ रोजी बक्षिस वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.
पथनाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. २५,०००/- व्दितीय क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. १५,०००/- तर तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. १०,०००/- आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी र.रू. ५,०००/- प्रमाणे दोन पारितोषिके वितरीत केली जाणार आहेत. तसेच व्यंगचिञ, कोलाज, वक्तृत्व, स्किट या स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांनादेखील प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. २५,०००/- व्दितीय क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. १५,०००/- तर तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक र.रू. १०,०००/- आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी र.रू. ५,०००/- प्रमाणे दोन पारितोषिके दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. नितीन घोरपडे प्राचार्य प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी यांचे कार्यालयात व महापालिकेत श्री. रमेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभाग (मो.नं.9850161138) यांचेशी संपर्क साधावा.
तरी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे व सविञीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.