पिंपरी :- भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. दोघांमध्ये दुरंगी लढत होत असून दोनवेळा अपक्षांच्या बाजूने कौल देणारे भोसरीकर तिसऱ्यावेळी अपक्षाच्या की पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदार संघातून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप विरुद्ध अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कलाटेंच्या बंडखोरीमुळे जगताप यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भोसरीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
भोसरीच्या लढतीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भोसरी मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी अपक्ष लढलेले विलास लांडे यांना पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. तर, २०१४ च्या निवडणुकीवेळी महेश लांडगे अपक्ष निवडून आले. त्यामुळे सलग दोन निवडणुकीत भोसरीकरांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यास विलास लांडे यांनी नकार दिला. लांडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने त्यांना पुरस्कृत केले आहे. महेश लांडगे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केले आहेत. त्या कामांच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून विलास लांडे यांनी देखील बैठका सुरु केल्या आहेत. लांडगे यांच्यावरील नाराजांच्या भेटी गाठी सुरु केल्या आहेत. चिखली परिसरात ताकद असलेले दत्ता साने, जालिंदर शिंदे हे लांडे यांच्यासोबत आहे. शिवसेना, भाजपमधील नाराजांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीवर लांडे यांची मदार आहे.
भोसरीच्या आखाड्यात हे उमेदवार असणार..!
भाजप महेश लांडगे, अपक्ष विलास लांडे, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर बोऱ्हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, अपक्ष हरेश डोळस, छाया जगदाळे, मारुती पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, डॉ. मिलिंदराजे भोसले, विष्णू शेळके, महेश तांदळे यांनी आज माघार घेतली आहे.
राहूल कलाटे देणार जगतापांना जोरदार टक्कर…
राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत चिंचवडमधून तिघांनी माघार घेतली. मात्र, कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता जगताप आणि कलाटे यांच्यात लढत होणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका सर्वपक्षांनी स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली होती. मोदी लाटेत देखील कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ६३ हजार ४८९ मते घेत चांगली लढत दिली होती. यावेळी शिवसेना-भाजपची महायुती आहे. जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. जगताप यांची ही तिसरी निवडणूक आहे. २००९ मध्ये जगताप सर्वांची मोठ बांधून अपक्ष निवडून आले होते. तर, २०१४ मध्ये भाजपकडून ते निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर पुन्हा कलाटे यांचे तगडे आव्हान असणार आहे. भाजपचे नाराज नगरसेवक देखील कलाटे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची मोठ बांधून कलाटे अपक्ष निवडून येतात की जगताप हॅट्रट्रिक करतात हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडमध्ये ‘हे’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!
भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांच्यासह सुरज खंडारे, डॉ. मिलिंदराजे भोसले, राजेंद्र काटे, रवींद्र पारधे हे निवडणुकीच्या मैदानत आहेत. तर कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे यांनी माघार घेतली आहे.
विलास लांडे यांना कपबशी तर, चिंचवडचे राहुल कलाटे यांना मिळाली बॅट….
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी व चिंचवड या दोन्ही मतदारसंघात प्रमुख विरोधी हे अपक्ष उमेदवार आहेत. सोमवारी उमेदवारी माघार घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. विलास लांडे यांना निवडणूक चिन्ह कपबशी मिळाली आहे. तर, राहुल कलाटे यांना निवडणूक आयोगाच्या वतीने बॅट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे आता उर्वरित १५ दिवसांत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणे हे कठीण काम या दोघांना यशस्वीपणे मतदारांपुढे न्यावे लागेल. जेणेकरून त्याच्या गळ्यात यशाची माळ पडेल.
पिंपरीत शेखर ओव्हाळ, सुलक्षणा शिलवंत, राजू बनसोडे यांची माघार…
पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, यांच्यासह नगरसेवक राजू बनसोडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत बनसोडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णा बनसोडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली. मात्र तीव्र इच्छुक असलेले शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र आज या दोन्ही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उमेदवार अण्णा बनसोडे, नगरसेवक राजू मिसाळ, रोहित काटे, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते.
अमित गोरखे, भीमा बोबडे, चंद्रकांता सोनकांबळे यांचा महायुतीला पाठिंबा…
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या तीनही बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे यांच्यासह आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. महायुतीच्या या तीनही बंडखोरांनी आज माघार घेतली आहे. महायुती शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबकस्वार यांना या सर्वांनी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राजू दुर्गे, अमोल थोरात, बबलू सोनकर, माधव मुळे आदी उपस्थित होते.