विरोधी पक्षनेते नाना काटे यांची भूमिका
पिंपरी :- महापालिकेच्या शहर परिवर्तन कार्यालयातंर्गत सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी सोशल मिडिया एक्सपर्ट नेमण्याचे नियोजन आहे. हा विषय एखाद्या विशिष्ट व्यक्तीस डोळयासमोर ठेऊन समोर आला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या कररुपी पैशांची नासाडी होणार आहे. त्यामुळे ही नियुक्ती करू नये, अशी भूमिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे मांडली आहे.
शहर परिवर्तन कार्यालयातंर्गत नागरिकांशी संलग्नता वाढविण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यासाठी सहा महिने कालावधीकरीता दरमहा 70 हजार रुपये या एकत्रित मानधनावर सोशल मिडिया एक्सपर्टची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी 4 लाख 20 हजार इतका खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी होता. मात्र, बुधवारी होणारी स्थायी समिती सभा गणसंख्येअभावी 22 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, या प्रस्तावाला काटे यांनी विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेत 2017 नंतर बाह्य सल्लागाराची मोठ्या प्रमाणात नेमणूक झालेली आहे. आतापर्यंत महापालिकेत नियुक्त झालेल्या सर्व आयुक्तांनी महानगपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून यशस्वीरीत्या कामे करवून घेतली. परंतु, सध्या ज्या प्रमाणात बाह्य सल्लागारांची नेमणूक होत आहे त्यावरून असे दिसते की महानगरपालिकेने नियुक्त केलेले अधिकारी काम करण्यास पूर्णपणे सक्षम नाहीत. तसेच, बाह्य सल्लागार नेमण्यामागे अजून काही हेतू असावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “स्मार्ट सिटी” प्रकल्पातंर्गत टेक महिंद्रा या कंपनीस करोडो रुपयांचे काम दिलेले आहे. त्यामध्ये “सोशल मीडिया मॅनेजमेंन्ट’ हा एक भाग आहे. ती कंपनी हे काम करू शकत नाही का? आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात “सारथी’ ही मदत प्रणाली तयार करताना अनेक संगणक अभियंत्यांची मदत घेण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतल्याचे मला आठवत नाही. जनतेच्या पैशाचा अशा तऱ्हेने अपव्यय व्हावा, यासारखी दुर्दैवी बाब नाही. जनतेचा कररुपी पैसा त्यांना सुविधा देण्यासाठी वापरण्यात यावा. सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांची, कार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी नाही. अशा तऱ्हेने कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक यांची बाह्य सल्लागार म्हणून होत असलेल्या नेमणुकीला तुम्ही आळा घाला.