कामशेत : कामशेत गावच्या हद्दीतील जुना पुणे मुंबई महामार्गाच्या कडेने पायी वाडीवळे गावाकडे चाललेल्या दोन बहिणींना कारमधून आलेल्या अज्ञातांनी लिफ्ट देण्याचा बहाण्याने गाडीत बसवुन त्यांचा जवळील सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लुटला. याबाबत सिंधुबाई भाऊ गायखे ( वय ५५, रा. खामशेत) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ( दि. १५) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिंधुबाई गायखे व त्यांची चुलत बहीण मथाबाई पांडुरंग गायखे अश्या दोघी माथाबाई यांची वडीवळे येथे राहणारी मुलगी वैशाली संजय थोरवे यांना भेटायला पायी चालल्या होत्या. त्याचवेळी महामार्गावरून पाठीमागून आलेल्या कारमधील एका अज्ञात युवकाने ‘ मावशी तुम्हाला कुठं जायचं आहे मी सोडवतो मी पण तिकडेच चाललो आहे ‘असे बोलून गाडीमध्ये बसवले. या गाडीत पुढील बाजूस दोन जण बसले होते. तर, मागील सीटवर दोघी व तो मुलगा बसला. वडीवले गेट पास करून सांगीशे रोडने गाडी वडीवळे येथे आल्यावर गाडी न थांबवता पुढे घेऊन जाऊ लागले असता दोघी बहिणी मोठ्याने ओरडल्याने तुम्ही ओरडु नका नाहीतर मारून टाकीन, असे म्हणून माथाबई हिस गळ्याला धरले. तर सिंधुबाई हिस तोंड दाबून खाली वाकवले, व तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या. असे म्हणत सोन्याचे गांठन, सोन्याची पणपोत, कानातील वेल असा सुमारे सत्तर हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरून त्यांना सांगिसे जवळील निर्जन ठिकाणी दोघींना गाडीतून उतरवुन खांडशी रोडने पलायन केले. या गाडीतील इसम २५ – ३५ वयोगटातील होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे हे करत आहेत.