पिंपरी | रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने ‘डॉगथॉन शो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जगभरातील दुर्मिळ आणि जातिवंत श्वानांना पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी (दि. 15) गर्दी केली. शो पाहण्यासाठी आलेल्या श्वानप्रेमींना श्वानांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
लॅब्रेडॉर, गोल्डन रेट्रीवर, पग्स, हस्की, ल्हासा अस्पो, चीहूआहूआ, रोटवेलर, पोमेरानियन, बिगल्स, कॉकर स्पॅनिअल, बॉक्सर आणि भारतीय जातींच्या सुमारे 80 श्वानांनी पिंपरी-चिंचवडकरांना भुरळ घातली. सावरकर भवन प्राधिकरण येथे झालेल्या या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, असिस्टंट गव्हर्नर सतीश आचार्य, रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
‘डॉगथॉन शो’मध्ये संपूर्ण भारतातून स्पर्धक आपल्या श्वानांसह सहभागी झाले. सकाळी आठ ते साडेअकरा या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. उत्कृष्ठ वेशभूषा, उत्कृष्ठ शरीरयष्ठी, सर्वोत्कृष्ठ सवयी या तीन प्रकारांमध्ये बक्षीस देण्यात आले. श्वानांवर आधारित असणारी ही स्पर्धा शहरवासीयांसाठी रोटरी क्लब मागील काही वर्षांपासून आयोजित करीत आहे. कार्यक्रमात डॉगवॉक, स्प्लॅश पूल, टॅलेंट शो, फॅशन शो, लीश वॉक यांसारख्या श्वानांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.