Chaupher News

तुझ्या शरीरात अपवित्र आत्मा असून, घरातील समृद्धी आणि व्यावसायिक वृद्धीच्या अपवित्र आत्मा आड येत आहे, अशी भीती घालत एका भोंदूबाबाने गायिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईतील चारकोप पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या.

पीडित गायिका ही रिमिक्स अल्बमसाठी काम करते. तर तिचा पती संगीतकार आहे. दोघेही चारकोप परिसरात भाड्याच्या घरात राहतात. तर उमेश रमाशंकर पांडे असं आरोपी भोंदू बाबाचं नाव आहे. तो सुद्धा चारकोप परिसरात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी पीडिता आणि तिचा पती गृहपूजेसाठी पूजारी शोधत होते. याचवेळी त्यांची उमेश पांडेशी ओळख झाली.

पीडिता आणि तिच्या पतीनं रविवारी पांडेला पूजेसाठी घरी बोलावलं होतं. पूजेचं साहित्य आणण्यासाठी पीडितेचा पती बाहेर गेला. त्यावेळी पांडे पीडितेला म्हणाला की, “तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे. त्यामुळे तुम्हाला व्यावसायिक वृद्धी नाही. अपयश येत आहे. शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी तुला निर्वस्त्र व्हावं लागेल,” असं पांडे यांने पीडितेला सांगितलं. त्यानंतर याचीच भीती घालून पीडितेला सोबत झोपण्यास सांगितलं. झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेने पतीसोबत चारकोप पोलीस ठाणे गाठत तक्रार केली.
पीडितेच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला बेड्या ठोकल्या. मंगळवारी या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं भोंदूबाबाला पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here