पिंपरी : फुलाचा सार त्याच्या सुगंधात असतो, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचा सार त्याच्या भक्तीत असतो. गुरुंच्या, सतांच्या, सानिध्यात ध्यान करून शांती मिळते तर कृष्ण भक्ती व नामस्मरणाने समाधीची अनुभूती येते. कर्माने मिळालेले धन, संपत्ती, प्रतिष्ठा अहंकाराने संपते. संसारिक जीवनातील माणूस अहंकारी असतो. त्याला अहंकारावर ताबा मिळविण्याचा मार्ग भागवत कथेच्या श्रवणातून मिळतो, असे मार्गदर्शन देवी चित्रलेखा यांनी केले.
शंभ्भू लोक सेवा संस्थानच्या वतीने नेहरुनगर पिंपरी येथील एच.ए. कंपनीच्या पटांगणावर चित्रलेखा यांच्या श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाचव्या दिवशीची आरती कर्नाटक हंपी येथील स्वामी पुर्णानंद भारती, नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, गीता तिलवाणी, प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, उद्योजक आबा नागरगोजे, शशी पांचाळ, लालबाबू प्रसाद, देवेंद्र मिश्रा, लालबाबू हरी प्रसाद, यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शंभ्भू लोक सेवा संस्थानचे अध्यक्ष जितेंद्र सिंग, उपाध्यक्ष हेमंत शिर्के, सेक्रेटरी रुपसिंग आझाद, एस. एस. तिवारी, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
पाचव्या दिवशीच्या प्रवचनात चित्रलेखा यांनी प्रवचनात सांगितले की, सुखाच्या शोधात जीवन व्यथित करणारा कृष्णभक्तीने शाश्वत सुख, शाश्वत आनंद आणि शाश्वत शांती मिळवितो. सुख आले तरी लालसा कमी होत नाही. नामस्मरणाने मन आणि इंद्रियावर ताबा मिळविता येतो. जीवन सार्थक होण्यासाठी व जीवनात परिवर्तन होण्यासाठी संतांच्या सान्निध्यात यावे व संतांनी सांगितलेल्या मार्गावर परिक्रमा करून मोक्षप्राप्ती मिळविता येते. त्याचबरोबर दिनदुबळ्यांचे अश्रू पुसून गोसेवा करावी हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे, असे चित्रलेखा यांनी प्रवचनात सांगितले.