साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रनिमित्त दांडिया नृत्य व रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्कूलमधील सर्व विद्यार्थी विविध रंगीबेरंगी पोशाख परिधान करून आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी नवरात्र व दसराविषयी माहिती देतांना सांगितले की आश्विन शु. दशमीला, दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी म्हणतात.
दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजेच सीमा ओलांडणे . समाजात काही विचित्र रूढी आणि जातीभेद धर्मभेद आहेत. उच्चनीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब लोकांना पुरेसे धान्य व वस्त्र मिळत नाही. अनेक गोष्टींमुळे सामाजिक जीवन गढूळ झाले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची आहे. म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे.
आपण हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल. खरे सोने आमच्या हाती लागेल. तसेच श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळविला तो हाच दसर्याचा दिवस, तसेच पांडवांनी अज्ञातवासात शमी वृक्षावर ठेवलेले आपआपली शस्त्रे घेऊन दुर्योधनाच्या सैन्याला पळवून लावले. रघू राजाने देवराज इंद्रावर विजय प्राप्त करून त्यापासून सोने मिळविले होते व ते सर्व जनतेस दान केले. अशा प्रकारे दसरा सण आपल्या जीवनात नवी चेतना, धर्म न्याय आणि मानवताची रक्षा करण्याची शिकवण देतो असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दांडिया नृत्यामध्ये सहभाग घेतला व नृत्याचे प्रदर्शन केले. त्यानंतर श्री. हेमंत देसले व सीमा देसले , स्कुलचे मुख्याध्यापक श्री.अतुल देव सर व व्यवस्थापक तुषार देवरे यांच्याहस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.