खेलो इंडिया महिला ज्योडो स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी केली पदकांची लूट
सा क्री : खेलो इंडिया महिला ज्यूडो राज्यस्तरीय स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी बाजी मारली. सन 2023 – 24 या शैक्षणिक वर्षाचे धुळे जिल्हयाला राज्यस्तरीय खेलो इंडिया महिला ज्यूडो स्पर्धेचे यजमान पद मिळाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून 1276 मुलींनी विविध वजन गटातून स्पर्धेत सहभाग नोंदविला. या भव्य दिव्य अशा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या 8 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. त्यातून 6 विद्यार्थीनींनी प्राविण्य दाखवत यश संपादन केले. यामध्ये, आर्या सोनवणे – रौप्य पदक, सिद्दी पोपली – रौप्य पदक, भार्गवी ठाकरे- रौप्य पदक, लावण्या भंडारी – कांस्य पदक, अश्विनी पाटील- कांस्य पदक, समीक्षा चव्हाण- कांस्य पदक, सायना शहा – कांस्य पदक यांनी पटकांवर नाव कोरले. विविध वजन गटातून पारदर्शक स्पर्धा घेण्यात आली. यासर्व यशस्वी विद्यार्थीनींचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी अभिनंदन केले. शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळेचे व्यवस्थापक तुषार देवर, शाळेचे व्यवस्थापक क्रीडा मार्गदर्शक, वैभव सोनवणे, क्रीडा शिक्षक कुणाल देवरे, ज्युडो प्रशिक्षक संजय जमदाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांसाठी वयोगटातील सक्षम खेळाडूंना प्रशिक्षण देणे हा खेलो इंडिया खेळांचा उद्देश आहे. ही भारतातील आयोजित एक राष्ट्रीय स्तरावरील बहु-क्रीडा स्पर्धा असून यामध्ये देशभरातील खेळाडू वेगवेगळ्या क्रीडा विभागांमध्ये स्पर्धा करतात. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांत भारताने क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. ही प्रचंड क्षमता जागतिक व्यासपीठावर दाखवण्याची गरज आहे. हीच वेळ आहे की आपण तरुण प्रतिभेला प्रेरणा देण्याची, त्यांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि सर्वोच्च स्तराचे प्रशिक्षण देण्याची. सक्षम खेळाडूंना खेळांमध्ये सहभागाची एक मजबूत भावना निर्माण करणे आवश्यक आहे. तरच भारत क्रीडा महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार करू शकेल. खेलो इंडिया कार्यक्रम आपल्या देशात खेळल्या जाणार्या सर्व खेळांसाठी एक मजबूत फ्रेमवर्क तयार करून आणि भारताला एक महान क्रीडा राष्ट्र म्हणून स्थापित करून तळागाळातील क्रीडा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विद्यार्थीनींना शुभेच्छा देताना व्यक्त केले.