प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये आनंदाची पर्वणी “दिपावली” उत्साहात
पिंपळनेर : प्रचिती पब्लीक स्कूलमध्ये आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशीचे आकर्षण म्हणजे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाश कंदिलांनी सजविण्यात आलेला होता. व्यासपीठावर दिपावली सणाच्या दृष्टीने वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज यांची आरास मांडण्यात आलेली होती. त्यानंतर गोवत्स, धनवंतरी, लक्ष्मी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले व शाळेतील शिक्षिकांनी धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या पाचही दिवसांची माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्यध्यापिका अनिता पाटील आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
नरकचतुर्दर्शी – हा दिपावलीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातावर मेहंदी काढतात. दिपावलीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात.
दिवाली – लक्ष्मीपूजन :– पाच दिवसांच्या दिपावलीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिपावली असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते व देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिपावलीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि महालक्ष्मी पूजा करतात.
पाडवा : – दिपावलीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिपावलीचे मिष्ठान्न खायला देतात.
भाऊबीज :- दिपावलीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात. भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधन इतका पवित्र मानला जातो. याबाबत माहिती देण्यात आली.
शाळेचे ३ वर्गाचे विद्यार्थी सर्वेश खैरनार – राम, प्रत्युश नांदेरे – लक्ष्मण, माहेश्वरि भदाणे – सीता, निवेद पाटील – हनुमान यांनी वेशभुषा साकारून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी कालिका माता – पारी घरटे, कुबेर देव – केतन सोनवणे यांची वेशभूषा साकारली. प्रसंगी, इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी भाऊबीज सण साजरा केला. त्यानंतर गायीचे पुजन करण्यात आले. आजच्या आनंदमयी प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दिपावली हा सण म्हणजे संस्कृती, परंपरा व एकता असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून गरिबांची दिपावली आनंदमय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरिबांना कपडे व फराळ वाटप, मिठाई- वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणी करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी व धनश्री मॅडम यांनी केले.