Chaupher News
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेत एकही उपसूचना नगरसेवकांनी द्यायची नाही आणि महापाैरांनी घ्यायची नाही, अशा सूचना करुनही बुधवारी झालेल्या महासभेत सहा उपसूचना स्विकारुन त्या गोंधळात मंजूर करण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. महापालिकेच्या महासभेत सतत देण्यात येणा-या उपसूचना कोणत्याही विषयाच्या असतात. त्यामुळे महासभेत उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असे सांगूनही प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला महापाैर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
दरम्यान, महापालिकेत हद्दीतील इमारतींना कर योग्य मूल्य वाढीच्या प्रस्तावावरुन महासभेत गोंधळ झाला. या गोंधळातच भाजपने कामकाज चुकीच्या पध्दतीने चालवित तीन मिनिटांत 18 विषयांना मान्यता दिली. वाचा… मंजूर, वाचा… मंजूर जणू असा सपाटा लावला होता. तसेच सभागृहातील गोंधळाचा फायदा घेत उपसूचना देखील स्विकारल्या आहेत. पाच विषयांना सहा उपसूचना दिल्या आहेत. या उपसुचनांचे कोणीही वाचन केलेले नाही. त्याला अनुमोदन दिलेले नाही. तरीही त्या महापाैरांनी मंजूर केल्या. सत्ताधा-यांनी प्रदेशाध्यक्षांचाच आदेश डावल्याने आता प्रदेशाध्यक्ष पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.