चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन दिवसाच सातत्याने शहरातील विविध भागात बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज (दि.०६) सकाळी आलेल्या अहवालात ७ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. तसेच शहराबाहेर एक महिला बाधित आढळली आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा उपचारा दरम्यान वायसीएम रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या ‘कोरोनाग्रस्त’ रूग्णांचा आकडा १४२ वर पोहचला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलल्या माहितीनुसार शहरातील मोशी, पिंपळे गुरव, चिंचवड परिसरात ७ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तसेच वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा ७१ वर पोहचला आहे. तर, शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १४२ वर पोचली आहे. तर आतापर्यंत एकूण ६० जण ‘कोरोनामुक्त’ झाले असून शहरातील तीन आणि शहराबाहेरील तिघांचा असे एकण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेने मंगळवारी (दि.५) कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये ७ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यात (२१, २३, २४,२५, २८, ५०) वर्षाच्या सहा पुरुषांचा समावेश आहे. तर २५ वर्षीय महिला ही कोरोनाबाधित आढळली आहे. तसेच शहराच्या बाहेरिल २८ वर्षीय महिलेचे रिपोर्टही ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

























