चौफेर न्यूज – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोणाचा हॉटस्पॉट ठरत आहे. मागील 24 तासात मालेगाव मधील तब्बल 75 पोलिस कोरोना पॉझिटव्ह सापडल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. बंदोबस्तावर असणारे पोलीस आणि एसआरपीएफ च्या जवानांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळ मालेगाव येथे भयावह परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी 80 % रुग्ण एकट्या मालेगावात आहेत. कोरोनाशी मुकाबला करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत परंतु स्थानिक नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आत्तार्पंत मालेगावामध्ये 416 कोरोना पॉझिटीव रुग्ण आढळून आले आहेत. गेल 24 तासात मालेगाव येथे पॉझिटीव सापडलेले पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये 9 पोलीस अधिकारी व 66 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटीव असलेल्या पोलिसांपैकी बहुतांश जण कन्टेनमेंट झोन मधे ड्युटीवर होते. या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास घेण्यात येणार आहे. तसेच या पोलिसांसोबत ड्युटीवर असणारे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. शासनाने दारू विक्री खुली केल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कोरोणाचा धोका अधिक आहे.
एप्रिल महिन्यात मालेगाव मध्ये एकूण 580 जणांचा मृत्यू झालचे समोर आले आहे. परंतु त्यापैकी केवळ 14 जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली होती. अचानकपणे मालेगाव मध्ये एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढलेल्या मृत्यूमुळे प्रशासन चक्रावले आहे. स्थानिक नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मालेगाव शहराशी दांडगा संपर्क असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांना राज्यशासनाने कालच खास मालेगाव शहराचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.