चौफेर न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा आणि सरकारी विभागांच्या पदभरती परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकसोबतच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने याबाबतची सविस्तर सूचनांचे परिपत्रक जाहीर केले आहे. लक्षणीय-दिव्यांग व्यक्‍तींबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची ‘मार्गदर्शिका 2021′ प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार दिव्यांग परीक्षार्थीला स्पर्धा परीक्षेला प्रविष्ट होताना लेखनाची अडचण येते; तसेच त्यांची लेखनाची गती कमी असल्यास त्यांना समस्या येऊ शकते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना लेखनिक, वाचक किंवा प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. या सुविधेसाठी दिव्यांग परीक्षार्थ्यांने सरकारी रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी परीक्षार्थ्याने संबंधित परीक्षा मंडळाकडे मागणी करायची असून, त्यानंतर मंडळाकडून लेखनिकांची यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे परीक्षा मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही परीक्षेसाठी असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असल्याबाबतची खात्री करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here