चौफेर न्यूज – एनडीए पाठोपाठ आता महिलांना राष्ट्रीय सैनिक महाविद्यालय आणि शाळांमध्येही प्रवेश मिळणार आहे. केंद्र सरकारने 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महिलांना राष्ट्रीय सुरक्षा अकादमीमध्ये (एनडीए) प्रवेश देण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार आता महिलांसाठी एनडीएच्या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. यात भर म्हणून आता केंद्र सरकारकडून महिला उमेदवारांना अजून एक भेट मिळणार आहे.

शैक्षणिक सत्र 2022-23 पासून आवश्यक संरचनात्मक बदल केले जातील. यानंतर, मुलींना सैनिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल. देहरादूनमधील सैनिक शाळेसाठी, 11.5 ते 13 वयोगटातील विद्यार्थीनी अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थेत प्रवेश घेऊ शकतील, असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी म्हणजे जून 2022 मध्ये विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी आणि त्यानंतर ज्या विद्यार्थिनींनी परीक्षा उत्तीर्ण केली अशा विद्यार्थीनींपैकी जानेवारी 2023 पासून दर सहा महिन्यांनी पाच मुलींना प्रवेश देण्यात येईल. दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ केली जाईल. या वाढीचा काही पायाभूत सुविधांवरही परिणाम होईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

मुलींच्या कॅडेट्ससाठी योग्य वैद्यकीय मानके आणि प्रशिक्षण अभ्यासक’माव्यतिरिक्त, गोपनीयता, सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रणालीमध्ये इतर अनेक सुधारणा आणि पुनर्रचना करणे आवश्यक असेल. अधिकार्‍यांचे मंडळ सर्व संबंधित समस्यांची तपासणी करत आहे जेणेकरून मुलींसाठी अनुकूल पायाभूत सुविधा बदलता येतील, असेही केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रतिज्ञापात्राची तपासणी जस्टिस एम. एम. सुंदरेश याचे खंडपीठ करत आहे. जर हे प्रतिज्ञापत्र मंजूर करण्यात आले तर महिलांसाठी आणि मुलींसाठी सैन्य भारती आणि त्यासंबंधीचे शिक्षण अजूनच सोपे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here