चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये एक मे रोजी कामगार दिनानिमित्त शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम सौ. वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर, श्री. तुषार देवरे सर, भारत मातेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. सपना देवरे मॅडम यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र भूमी, महाराष्ट्र रानातला कळस, अंगणातील तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र होय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीचे बीज रोवले तर लोकमान्य टिळकांनी याच महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेला आव्हान दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या देशाला संविधानाचा आकार दिला. सामाजिक सुधारणा असोत की सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राने नेहमीच देशाला वाट दाखवलेली आहे. आपल्या या महाराष्ट्राला त्यागाची पराक्रमाची आणि देश प्रेमाची फार मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशकार्यासाठी जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्रात मिळाले .तेवढे इतर कुठेही मिळाले नाहीत. म्हणूनच गांधीजींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस. एम .जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे. तर या राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तेव्हा आजचा दिवस हा या संघर्षाला आठविण्याचा दिवस आहे. सागरी किनारा, हिरवी रान, सुंदर शेत, दगड, धोंडे आणि डोंगरांनी बनलेल्या या महान जन्मभूमीला नमन करताना महान नाटककार राम गणेश गडकरी म्हणतात, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, असे विचार व्यक्त केले.