चौफेर न्यूज – साक्रीच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यु. कॉलेज सह प्राचार्या तसेच विभागानुसार शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
शिक्षक हा कुठलेही राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वात पूरक असा व्यक्ती असतो. प्राचीन काळापासून आपण गुरु आणि शिक्षकाचे महात्म्य ऐकून आहोत.
शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्याचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभवताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतिमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची असते. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो.
या सर्व बाबींची व बांधिलकीची जाण असणारे शिक्षक रुपी कोहिनूर हिरे प्रचितीमध्ये आहेत. विनोबा भावे म्हणतात शिक्षक विद्यार्थिनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा. शिक्षक जर विदयार्थीनिष्ठ असेल तर कळ्यांचे फुलात रूपांतर करू शकतो. पाठ्यपुस्तकाबरोबरच उघड्या जगाचे पुस्तकही शिकवतो.चांगला विदयार्थीनिष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडवू शकतो. आणि तो आपल्या पंचंद्रियांना ज्ञानसन्मुख करून जीवनाला समृद्ध करणाऱ्या संस्कारांचीही तो पेरणी करू शकतो. या सर्व गोष्टींचे ज्ञान असणारे शिक्षक यांची दखल महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या राज्यस्तरीय संघटनेने घेतली.अध्यापन हा पोटार्थी धंदा नसून तो धर्म आहे. अध्यापन ही समर्पित भावनेने करावयाची उपासना आहे. याचं आचरण प्रचितीच्या सर्व शिक्षकांमध्ये आहे. प्रचिती ही केवळ अक्षर ओळख करून देणारी आणि चार गणिते, दोन कविता शिकवणारी शाळां नाही तर कर्तबगार नवी पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे, अशी भूमिका घेऊन काम करणारा प्रचितीचा प्रत्येक शिक्षक हा अष्टपैलू आहे.
विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने Maharashtra English School Trustees Association या राज्यस्तरीय संघटनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या गुणांचा गौरव करण्यासठी शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी विद्यार्थ्यांचे भविष्य नाहीतर भविष्यासाठी विद्यार्थी घडविणाऱ्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज साक्री या साक्री तालुक्यातील एकमेव CBSE Affiliated शाळेला सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे 24/7 आपल्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपड करणाऱ्या, विद्यार्थी हाच ध्यास आणि श्वास असणाऱ्या प्राचार्या सौ.भारती मनीष पंजाबी यांना नियोजनपूर्वक प्रशासनाबद्दल उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे
आपल्या अध्यापनालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणाऱ्या तसेच उत्कृष्ट अध्यापनाबद्दल व अध्यापनाची सर्व कौशल्यांचा अंतर्भाव केल्या बद्दल पूर्व प्राथमिक विभागातून सौ श्वेता सोनवणे, माध्यमिक विभागातून श्री तुषार देवरे, सौ स्मिता नेरकर व श्री धर्मराज अहिरे यांना तसेच प्रचीती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथील सौ. अर्चना देसले व सौ अनिता पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांमागे खऱ्या अर्थाने विद्यार्थी व शिक्षकांप्रती तळमळ असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रशांत भीमराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.शाळा प्राचार्या आणि शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे शिक्षकांना भविष्यात शैक्षणिक कार्य करण्यासंदर्भात अजून ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे.