चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडमध्ये दिल्ली मधून नेमके किती संशयित आले हे आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीतून २३ जण पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले असून या २३ ही जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या २३ जणांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरू असून वेळप्रसंगी त्यांनाही रुग्णलयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमध्ये ३३ जण दिल्लीहून आल्याची चर्चा होती. मात्र यातील १० जण पिंपरी चिंचवड शहरातून काही दिवसांपूर्वीच स्थलांतरित झाले असून त्या त्या ठिकाणच्या यंत्रणांना त्यांची माहिती देण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी लॉकडाऊन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
सुरूवातीला सर्वाधिक म्हणजे १२ रूग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या बारा दिवसांत एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेला नाही. तर त्यातील १० रूग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन मधून आलेल्या या २३ संशयित रूग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे. आता या संशयित रूग्णांचे रिपोर्ट काय येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.