चौफेर न्यूज – दि. 2 ऑगस्ट 2019 पासून नगर विकास विभागाचा महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमीत होऊनही प्रत्यक्षात शासन निर्णयातील त्रुटींमुळे वर्ष होत आले तरीही प्रत्यक्षात शिक्षकांना कुठलाही लाभ मिळाला नव्हता.
आयोग लागू करण्यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या समवेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व आमदार महेशदादादा लांडगे यांच्या मध्यस्थीने मा. आयुक्त यांच्या दालनात बैठकीचे आयोजन होऊन 2 फेब्रुवारी 2020 रोजी मनपा प्राथ. शिक्षकांना आयोग लागू करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा मनपा स्तरावर विलंब होत गेला.
अखेर शासनाच्या शासन निर्णयातील त्रुटीची दुरुस्ती वा शुद्धीपत्रक शासनाकडून सद्यस्थितीत होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने मनपा स्तरावरच साधारण 1500 कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनश्रेण्या पडताळणी करून मान्यतेसाठी शिक्षक संघटनेच्या आग्रहाला पाठींबा दर्शवत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी मा.आयुक्त यांच्याकडे शिक्षकांना आयोग लागू करण्याची आग्रहाची मागणी केली. व आज दि 14 जुलै रोजी या आदेशावर आयुक्त यांची स्वाक्षरी झाली. त्यामुळे साधारण 1500 मनपा कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
*कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीतही मनपाचे प्राथमिक शिक्षक सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. मनपा कर्मचाऱ्यांना जून चे वेतन आयोगाप्रमाणे मिळाले आहे. त्यासाठी प्राथ.शिक्षकांनाही शासनाच्या शुद्दीपत्रकाची प्रतीक्षा न करता मनपा स्तरावरच आयोग मिळावा, व आज त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी होऊन, त्यावर शिक्का मोर्तब झाला. या पाठपुराव्यामुळे आज शिक्षकांना आदेश मिळाल्याने शिक्षकात आनंद असल्याचे समाधान असल्याचे सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी सांगितले.