चौफेर न्यूज – यंदा 15 जूनपासून सुरू होणारे नवीन शैक्षणिक वर्षही ऑनलाइन वर्गातच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण, उजळणी वर्ग, स्वाध्याय पुस्तिका असे पर्याय शिक्षण विभाग उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.
शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणेच यंदा 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही कोरोना स्थिती पूर्णपणे आटोक्यात आली नाही. मुंबई, पुणे भागांतील रुग्णसंख्या स्थिर असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले : सध्या विद्यार्थी शिकत असलेल्या इयत्तेमध्ये नेमक्या किती बाबी विद्यार्थ्यांना समजल्या, याबाबत शिक्षकांनाही अंदाज येत नसल्याने उजळणी घेतली जाणार आहे.
दरम्यान त्यासाठी स्वतंत्र अभ्यास साहित्यही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विकसित करत आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय पुस्तिकांचाही पर्याय आहे.
यंदा सर्वच इयत्तांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी दूरदर्शनकडे प्रस्तावही पाठवला आहे.