तेजस पाटील : आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचा निर्णय
चौफेर न्यूज – कोरोना महामारीमुळे अनेक पालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांसमोर शिक्षणाची मोठी समस्या उभी आहे. अशा मुलांना आकुर्डी येथील डी.वाय.पाटील महाविद्यालय मोफत शिक्षण देणार असल्याची माहिती डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी दिली.
सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. एकीकडे टाळेबंदी व आर्थिक चणचण तर दुसरीकडे सामान्य माणूस भरडला जात आहे. अशातच मध्यम वयीन रुग्णांचे निधन झाले तर लहान किंवा तरुण मुले एकाकी पडतात. अशा भयावह परिस्थितीचा विचार करुन सामाजिक बांधिलकी जपत आकुर्डी स्थित डॉ.डी.वायपाटील शैक्षणिक संकुलाने त्यांच्या अधिपत्याखालील कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जर कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले तर त्या विद्यार्थ्यांचे उर्वरित शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी सांगितले.
सध्य स्थितीत या वर्गवारी मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू असून येत्या आठ दिवसांत तसे आदेश महाविद्यालयाला दिले जातील,असे प्रभारी संचालक डॉ. नीरज व्यवहारे यांनी सांगितले.
डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी हे नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सामाजिक, आर्थिक मदतीचे असे अनेक निर्णय घेत असते व त्यामागे संस्थेचे उपाध्यक्ष तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रेरणा आहे.
– डॉ.नीरज व्यवहारे, प्रभारी संचालक