चौफेर न्यूज – मागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या वतीने आरोग्य विभागाच्या रिक्त पदांवर घेण्यात येणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. हॉल तिकीटांमध्ये असलेल्या घोळानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करताच आता नवी समस्या समोर आली आहे. ती म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) एकाच दिवशी आल्या आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र आल्याने आता नवा घोळ निर्माण झाला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET)ची परीक्षा एकत्र आल्या आहेत. मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे की, आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे, अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल. आरोग्य विभागाची परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती. पण, अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ही परीक्षा घेण्याचं काम सरकारनं न्यासा कंपनीला दिलं आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग्रस्त आहे. पंजाबमधील ढिसाळ कामगिरीबद्दल या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. यापूर्वी अनेक घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागाच्या परीक्षांचं काम दिलं होतं. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो आहे.