चौफेर न्यूज – प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी कांतीलाल गुजर तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश पारखी यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांचा बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून अरुण साकोरे यांनी काम पाहिले.
प्रेरणा बॅंकेचे नवनिर्वाचित चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन सुरेश पारखी, संस्थापक तुकाराम गुजर, प्रेरणा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, संतोष मुंगसे, संजय पठारे, अक्षय गुजर, नाना शिवले, नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड. अजितकुमार जाधव, राजाराम रंदील, राजेंद्र शिरसाठ, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे या सर्वांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, लक्ष्मण बेहरे आदि मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक तुकाराम गुजर यांनी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत सभासदांनी केलेल्या सहकार्याचा आणि संचालक मंडळावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले.
चेअरमन कांतीलाल गुजर यांनी आगामी वर्ष हे बँकेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सभासद, खातेदार यांचा विश्वास सार्थ ठरवत पाचशे कोटीं रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण करू असा संकल्प व्यक्त केला. या वर्षात बँकेमार्फत नवनवीन योजना राबवत बँक अधिक गतिमान करू आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा देत बँक अधिक सक्षम केली जाईल, असे सांगितले. संचालक मंडळ, पदाधिकारी, सभासद, ठेवीदार, खातेदार आणि कर्मचारी वर्ग या सर्वांनी एका विचाराने ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ‘ या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचे आवाहन केले.
नवनिर्वाचित व्हाइस चेअरमन सुरेश पारखी यांनीही बँक वाढीसाठी कटिबद्ध राहू या. आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू या असे मत व्यक्त केले.
प्रेरणा बँकेच्या पंधरा शाखा असून बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. बँकेच्या ठेवी ४१८ कोटी असून पुढील एक वर्षात ५०० कोटीचा टप्पा पूर्ण करू, असा बँकेचा संकल्प आहे.