विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पना प्रदर्शित करण्यासाठी “जल्लोष शिक्षणाचा २०२२” उपक्रमाचे आयोजन
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची माहिती
पिंपरी, १४ डिसेंबर २०२२: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शालेय स्तरावर “जल्लोष शिक्षणाचा २०२२” या स्पर्धेचे दि. १४ डिसेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात येत असून शिक्षण विभाग आणि सिटी ट्रान्सफर्मेशन ऑफीस (CTO) यांच्या मार्फत आकांक्षा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच, दि. २४ ते २६ जानेवारी २०२३ रोजी आनंदोत्सव (कार्निवल) चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुमारे १२९ शाळांमध्ये सुमारे ५८,००० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा शाळा ८ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विभागल्या असून शाळा व शिक्षकांचा शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग वाढावा तसेच अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याभोवती स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे महत्वाचे आहे. “जल्लोष…शिक्षणाचा २०२३” या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा, कला आणि हस्तकला, नावनोंदणी, सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर आदी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस असून त्यांच्या कल्पना, विचारसरणीला चालना मिळणार आहे.
“जल्लोष शिक्षणाचा – २०२२” या स्पर्धात्मक उपक्रमात शालेय स्पर्धा अंतर्गत मूल्यमापन समिती गठीत केली जाणार आहे. समिती मापदंड पडताळणी करणार आहे. शालेयस्तरावरील मूल्यांकन दि. १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत होईल. प्रत्येक झोनमधून महापालिकेची प्रत्येकी एक शाळा याप्रमाणे एकूण ८ शाळा मॉडेल शाळा ठरविल्या जातील. शाळांना बक्षीस देखील देण्यात येईल. मिळणा-या बक्षिस रकमेतून २५ टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचा शाळांना अधिकार दिले जातील. उर्वरित ७५ टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविण्याकरीता खर्च केली जाईल.
मनपा व खाजगी शाळांकरीता आयोजित विद्यार्थी स्पर्धा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतून इ. ५ वी ते ९ वी मधून ५ विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे किमान ५ ते १० गट या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक गटाने स्मार्ट सिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पर्यावरण, आरोग्य आदी विषयांवर सादरीकरण व मॉडेल तयार करणे आवश्यक राहील. मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक शाळेतून १ किंवा २ उत्कृष्ट गटाची निवड करुन, या गटाची आंतरशालेय स्पर्धेकरीता नोंदणी करतील. विद्यार्थी स्तरावरचे मूल्यांकन दि. १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत होईल. आंतरशालेय स्पर्धेत मनपा शाळेतील विद्यार्थी आणि खाजगी शाळेतील विद्यार्थी यांना वेगवेगळी पारितोषिके देण्यात येतील.
दोन दिवसीय कार्निवल (आनंदोत्सव) मध्ये विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार केला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शित करणारे स्टॉल्स्, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स्, गेम झोन, AEROModelling Show आदींची रेलचेल असलेले कार्यक्रम होणार असल्याचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले आहे.
असा असेल उपक्रम…
१. दि. १४ ते २० डिसेंबर २२ या कालावधीत महापालिका शिक्षण विभागाद्वारे सर्व मनपा शाळांमध्ये माहिती पत्रक प्रसारित करण्यात येणार असून सदर पत्रक शिक्षण विभागाकडे सादर केले जावे.
२. दि. २६ डिसेंबर २२ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत मूल्यमापन समिती शाळांना भेट देवून शाळेद्वारे शीट मध्ये भरलेल्या सर्व डेटाची प्रत्यक्ष पडताळणी करेल.
३. दि. १८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत शाळांनी ५ वी ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान आणि पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता आदी विषयांवर अंतर्गत स्पर्धा आयोजित करावयाची आहे. शालेय स्तरावर स्पर्धेत ४ विद्यार्थ्यांचा गट असेल. सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर मॉडेल, केसपेपर, अहवाल, सादरीकरणे आदी विकसित करणे अपेक्षित आहे. त्यातूनच शिक्षक आणि मुख्याध्यापक एक गट निवडण्याचा निर्णय घेतील.
४. दि. १५ जानेवारी २०२३ रोजी प्रत्येक शाळेतील निवडलेला गट आंतरशालेय स्पर्धेसाठी नोंदणी करेल. ज्यामध्ये, गटाला २ दिवसीय कार्निव्हलमध्ये त्यांचे मॉडेल सादर करण्याची संधी मिळेल. कार्निव्हलला भेट देणाऱ्या इतर शालेय विद्यार्थ्यांना मॉडेल समजावून सांगण्यासाठी त्यांना कार्निव्हलमध्ये एक स्टॉल देखील दिला जाईल. कार्निव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट ५ मॉडेल्सना बक्षीस देण्यात येईल.
५. दि. २४, २५ जानेवारी २०२३ या २ दिवसीय कालावधीत कार्निव्हल कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, पुस्तकांचे स्टॉल, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, ट्रेझर हंट आदी निवडलेल्या गटाचे स्टॉल असतील. तसेच विविध स्पर्धांसाठी सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येईल.
६. दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सर्व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एच.ए. मैदानावर एक विशेष एरोमॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात येणार आहे.