पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत गोवरची एकूण १७ बालकांना लागण झाली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात आढळलेल्या १३ बाधित रुग्णांचा समावेश आहे. तर, ३८२ संशयित बालरुग्ण आढळले आहेत. गेल्या साडेअकरा महिन्यांतील ही परिस्थिती आहे.
नव्याने आढळलेल्या १३ बालरुग्णांमध्ये कुदळवाडीमधील ५, थेरगावमधील २ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय, शहरातील मोशी व अन्य भागात ६ रुग्ण आढळले आहेत. शहरात १ जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे ३८९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७ रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
३ हजार ९४ बालकांना डोस..
महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत २ लाख ३८ हजार ५०९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, ८ लाख ४८ हजार ३८९ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. पाच वर्षांखालील ५२ हजार ९९२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. व्हिटॅमिन एची मात्रा २७ हजार ८०८ बालकांना देण्यात आली आहे. ३ हजार ९४ बालकांना गोवर रुबेलाचा पाहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.